Published on Jan 29, 2021
Christmas Essay in Konkani : नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी मुख्यत्वे २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. काही ठिकाणी ह्या सणाऐवजी एपिफनी सण ६, ७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो.
ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. त्या वेळेपासून नाताळ हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. भगवान येशूंच्या जन्माची सुवार्ता विशद करणाऱ्या मॅथ्यू आणि ल्यूक यांच्या ज्या कथा आहेत त्यामध्ये तसेच प्राचीन ख्रिस्ती लेखकांनी सुचविलेल्या तारखांमध्ये काही तफावत दिसून येते. सर्वात प्रथम इ.स.पू. ३३६ मध्ये रोम येथे ख्रिसमस हा सण साजरा झाला असे मानले जाते.
या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. तसेच आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवले जाते. ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ (ख्रिसमस ट्री - नाताळसाठी सजवलेले सूचिपर्णी झाड) हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. याच दिवशी रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते. यामध्ये चॉकलेट, केक, इ. वेगवेगळे पदार्थ बनविले जातात.
ख्रिस्ती लोकांचा धर्मग्रंथ बायबलच्या लूक व मत्तय या दोन्ही शुभवर्तमानात ( Gospel) मध्ये ख्रिस्तांच्या जन्माची हकीकत वर्णन केली आहे. त्यानुसार त्याचा जन्म जुदेआच्या बेथलेहेम या गावी एका गोठ्यात झाला. संत लूकच्या लेखनातून येशूची आई मारिया आणि वडील योसेफ यांच्या दृष्टिकोनातून बेथलेहेमच्या यात्रेचा वृत्तान्त दिलेला आहे. असे मानले जाते की, या दिवशी देवदूताने त्यांना मसिया म्हणून उद्देशिले व आजूबाजूचे सर्व मेंढपाळ त्यांची स्तुती करत होते. तसेच संत मॅॅथ्यू यांच्या सुवचनानुसार तीन राजे येशूंना भेटायला आले होते. त्याच लोकांनी येशूला भेटवस्तू दिल्या. येशूंच्या जन्माचा संदेश मिळताच त्यावेळच्या राजा हेरॉडने दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना ठार मारायचे आदेश दिले. त्यामुळे येशूंचे कुटुंबीय जीव वाचवण्यासाठी इजिप्तला गेले.
रोमन कालगणनेनुसार २५ डिसेंबर ही तारीख हिवाळ्यातील संक्रांत अथवा अयनकाळाचा दिवस आहे. प्रतीकात्मक कारणासाठी भगवान येशू यांनी आपल्या जन्मासाठी हा सर्वात छोटा दिवस निवडला अशी धारणा आहे. प्राचीन धर्मोपदेशक ऑगस्टाईन यांनी नोंदविले आहे की आपल्या पृथ्वीय अनुमानानुसार भगवान येशू सर्वात छोट्या दिवशी जन्माला आले. तरीही त्यामागील उदात्त आशय असा आहे की त्या दिवसानंतर पुढे दिवस मोठा होत जातो. त्यामुळे भगवान येशू आपल्यासाठी लीन झाले आणि त्यांनी आपल्या उन्नतीचा मार्ग आपल्याला दाखविला. कारण यानंतरच्या दिवसांमध्ये सूर्य अधिक काळ प्रकाश देत राहतो.
या जन्माच्या स्मरणाचे औचित्य साधून चर्चमध्ये सायंकाळपासून प्रार्थना म्हणण्यात येतात.ख्रिस्ती बांधव या विशेष उपासनेस आवर्जून उपस्थित राहतात. काही ठिकाणी नाताळ सणापूर्वी आठवडाभर लहान मुले घरोघरी जाऊन येशूच्या जन्माची गाणी म्हणतात. त्यांना कॅराॅल असे म्हणतात.
वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ज्या एका अनमोल सुवर्णक्षणासाठी इस्राएली जनता आतुरतेने थांबलेली होती. तो क्षण शेवटी जवळ आला. देवाने गालीलातील नाझरेथ नावाच्या गावी राहत असलेल्या जोआकिम आणि ॲना या संतद्वयाच्या पोटी एका निष्कलंक कुमारिकेला जन्माला घातले. पवित्र मारियेचा जन्म ही मानवाच्या तारणाची मंगल पहाट होती. अजूनही नीतिमत्तेचा सूर्य जगावर तळपंण्यास अवकाश होता. पुरेश्या वयात आल्यावर जोकिम आणि आन्ना यांनी आपली सुकन्या योसेफ नावाच्या सुताराला दिली. दोघांची सोयरीक झाली. परंतु विवाह समारंभांआधीच मारिया गरोदर असल्याचे दिसून आले. ती पवित्र आत्म्याच्या योगे गर्भवती झाल्याचे स्वप्नातील दर्शनाद्वारे एका दूताने योसेफाला सांगितले. मोठ्या आनंदाने त्याने मारियेला आपली पत्नी म्हणून स्वीकारले.
योगायोगाने त्याच वेळी सीझर आॅगस्टस याने साऱ्या जगाची नावनिशी लिहिली जावी अशी आज्ञा केली. योसेफ हा बेथलेहेम या गावचा असल्याने त्याने आपल्याला वाग्दत्त असलेली मारिया हिलाही आपल्या बरोबर घेतले. तेथे पोहोचल्यावर तिचे दिवस भरले. परंतु सर्व उतारशाळा (धर्मशाळा) भरल्या होत्या. त्यामुळे गाईच्या गोठयात त्यांनी आसरा घेतला. तिथेच मारियेने आपल्या पुत्राला जन्म दिला. मानव होऊन देव माणसात वस्ती करू लागला. स्वर्गीय देवदूतानी आपल्या राजेशाही थाटात त्यांच्यासाठी गायन गायिले. मेंढरे राखणाऱ्या मेढपाळानी दिव्य बाळाचे दर्शन घेतले. पूर्वेकडच्या विद्वान लोकांनी येशू बाळाचा शोध घेऊन त्याला नमन केले. तर हेरोद राजाचे धाबे मात्र दणाणले. अशा प्रकारे कितीतरी वर्षापूर्वी विविध भविष्यवाद्यांनी जुन्या करारात केलेले भाकीत पूर्ण झाले. कुमारी गर्भवती होईल आणि पुत्र प्रसवेल. (यशया : ७:१४). यहुद्यांच्या वंशास तारणारा जन्मास येईल. (उत्पत्ती : ४९:१०) तो दाविदाच्या घराण्यात जन्म घेईल. (येहेज्केल : ३४:२३). ख्रिस्तजन्मापूर्वी (इ. सन. ५०० वर्ष आधी) मिखा भविष्यवाद्याने देखील हेच भविष्य सागितले होते. (मिखा ५:२)
भगवान येशूंच्या जन्माचा स्मरणउत्सव साजरा करण्याचा विविध प्रथा–पद्धती स्वतंत्रपणे विकसित झाल्याचे दिसून येते. या प्रथांना येशूजन्मपूर्व काळातील साजरा होणाऱ्या पगान संस्कृतीच्या शीतकाळातील अयनदिवसांच्या उत्सव साजरे करण्याचे संदर्भ जोडलेले दिसतात. पगान जमातीने कालांतराने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. भेटवस्तूंची देवाणघेवाण हा त्यातीलच एक भाग.
नाताळ सणामध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः लहान मुलांना या सणाची खूप हौस असते. महाराष्ट्रातील ख्रिस्ती लोक दिवाळीप्रमाणे या दिवशी करंज्या व अन्य खाद्यपदार्थांचे एकमेकांस आदान-प्रदान करतात. लहान मुलांना सांताक्लॉजच्या वेषात येऊन भेटवस्तू देण्यात येतात.
नाताळची शुभेच्छापत्रे कुटुंबातील सदस्य आणि आप्त, स्नेही यांना पाठवली जातात. पारंपरिक पत्रांमध्ये नाताळ आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिलेल्या असतात. काही पत्रांमध्ये बायबल मधील विचार, कविता इत्यादीचा समावेश असतो. बर्फाने व्यापलेला प्रदेश, नाताळबाबा, त्याची गाडी, ख्रिसमस ट्री अशी विविध चित्रे यामध्ये असतात. पहिले व्यावसायिक नाताळ शुभेच्छापत्र इ.स. १८४३ मध्ये सर हेन्री कोल यांनी बनवले. आता ही पद्धत जगभरात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झालेली दिसून येते.
सांताक्लॉज किंवा संत निकोलस हे नाताळ सणाचे प्रमुख वैशिष्ट्य होय. सांताक्लॉज ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा असून त्याला मराठीत नाताळबाबा असे म्हणतात. पाश्चिमात्य ख्रिश्चन संस्कृतीत मानले जाते की चांगली वर्तणूक असलेल्या लहान मुलांना नाताळच्या आदल्या रात्री सांताक्लॉज भेटवस्तू देऊन जातात.
सांताक्लाॅजचे चित्रण सामान्यतः बुटकी, वृद्ध, पांढऱ्या दाढीची, लाल अंगरखा घातलेली, चष्मा लावलेली व्यक्ती असे केले जाते. लहान मुलांसाठी भरपूर भेटवस्तू भरलेली एक मोठी पिशवीही याच्यासोबत असते. अमेरिका आणि कॅनडा या देशांत ही व्यक्तिरेखा १९व्या शतकापासून विशेष लोकप्रिय आहे.
हे बाजार साधारणतः नाताळच्या आधी चार आठवडे रस्त्यांवर सुरू होतात.दर आठवड्याच्या शेवटी हे बाजार भारतात. या कल्पनेची सुरुवात जर्मनीत मध्ययुगात झाली. डेट्रेन शहरात १४३४ मधे सुरू झाले.आता हे बाजार युरोपात अधिक लोकप्रिय झाले आहेत. विशेष ठिकाणच्या म्हणजे न्यूर्नबर्ग,फ्रंकफर्ट,कोलोन, व्हिएन्ना या ठिकाणचे असे बाजार लोकप्रिय आहेत. ऐतिहासिक ठिकाणे,संग्रहालये अशा ठिकाणी हे बाजार भरतात. काही बाजार हे मध्ययुगीन,बोहेमिअन,पोलिश अशा विषयांवर आधिरित हे बाजार असतात.येशूशी संबंधित देखावेही असतात. पारंपरिक सोललेले, रोस्टेड बदाम, पिझ्झा, वाईन, केक असे पदार्थ, रोषणाईचे साहित्य यांची बाजारात रेलचेल असते. मेणबत्त्या,लाकडी वस्तू, स्थानिकांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी असतात. जत्रेचे स्वरूप या बाजारांना असते.स्थानिक संस्कृतीचा परिचयही या बाजारांमधून होतो.
नाताळच्या दिवशी काही भाविक उपवास करतात. तथापि सणाच्या आनंदानिमित्ताने वाईन, फळे घातलेला विशेष नाताळ केक, भाजलेली टर्की, पुडिंग, चाॅकलेटचे विविध प्रकार, बिस्किटांचे प्रकार, उकडलेल्या बटाट्याचे आणि अंड्यांचे,आणि मांसाहारी खास पदार्थ आवर्जून केले जातात.